लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता महिला जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, जानेवारीचा हप्ता येण्याआधीच राज्यातील लाखो महिलांना मोठा धक्का बसला आहे. कारण, या योजनेअंतर्गत लाखो महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारकडून योजनेअंतर्गत केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. या तारखेपूर्वी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभ थेट बंद करण्यात आला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, केवायसी करूनही तब्बल २४ लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समोर आले आहे.
या २४ लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, यामागचे मुख्य कारण म्हणजे केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका. विविध तांत्रिक अडचणी, प्रश्न नीट न समजणे आणि चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक महिलांची केवायसी अपात्र ठरली. एका अहवालानुसार, केवायसीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता – “तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत आहे का?” या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘नाही’ असे अपेक्षित होते. मात्र, अनेक महिलांनी चुकून ‘हो’ असे उत्तर नोंदवले. त्यामुळे संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आणि त्यांचा लाभ थांबवण्यात आला. परिणामी, पात्र असतानाही केवायसीतील चुकीमुळे लाखो महिलांना हप्ता मिळालेला नाही.
या प्रकारामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी तक्रारींचा पाऊस पडत आहे. अनेक लाभार्थी महिलांनी बँक, अंगणवाडी केंद्र, पंचायत कार्यालय आणि प्रशासनाकडे धाव घेतली आहे. “आम्ही पात्र असूनही केवळ एका चुकीच्या उत्तरामुळे आमचा लाभ बंद झाला,” अशी भावना अनेक महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येची दखल घेत राज्य सरकारने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे पैसे केवायसीमुळे रखडले आहेत, त्यांची प्रत्यक्ष पडताळणी (फिजिकल व्हेरिफिकेशन) केली जाणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी प्रक्रिया राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन संबंधित महिलांची माहिती तपासणार असून, त्या खरोखर पात्र आहेत की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार, याकडेही महिलांचे लक्ष लागले असून, सरकार लवकरात लवकर या प्रक्रियेचा निकाल लावेल, अशी अपेक्षा लाडक्या बहिणींमध्ये आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देण्याचा असल्याने, तांत्रिक चुका आणि प्रशासकीय अडचणींमुळे पात्र महिलांचा लाभ थांबू नये, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.