राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर मराठा-ओबीसी संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ओबीसी समाजाने या जीआरला जोरदार विरोध करत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर बंजारा समाजाने एसटीमध्ये समावेशाची मागणी केल्याने आदिवासी समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अनासपुरे म्हणाले की, “समाज तुटू नये, कारण समाज तुटला तर अराजक निर्माण होणार. आपण सगळे भावंडं आहोत. संकटाच्या काळात आपण एकत्र धावून जातो. गावकी आणि भाऊकी जशी एकत्र होती, तशीच पुढे राहिली पाहिजे. एका मोळीची आणि एका लाकडाची गोष्ट सर्वांना माहिती आहे – मोळी बांधलेली असेल तर तोडणे शक्य नाही, पण जर लाकूड वेगळं झालं तर सहज तोडता येतं. त्यामुळे आपण एकत्र राहिलो पाहिजे, हेच खरे बळ आहे.”
ते पुढे म्हणाले की, “हैदराबाद गॅझेटमुळे निर्माण झालेला तणाव गंभीर आहे. समाजात फूट पडल्यास राज्यात अस्थिरता वाढेल. त्यामुळे प्रत्येकाने शांतता, एकजूट आणि परस्पर आदराने वागले पाहिजे.”
शेतकरी विषयावर बोलताना अनासपुरे यांनी सरकारकडे थेट मागणी केली. “निसर्गाचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर निसर्गाचं रौद्ररूप आपण पाहतोय. सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, हीच माझी विनंती आहे. पाण्याची चळवळ आम्ही केवळ सुरू केली नाही, तर तिचा दशकपूर्ती सोहळा साजरा केला आहे. शेती आणि शेतकरी वाचवणं हीच खरी प्राथमिकता असली पाहिजे,” असे ते म्हणाले.
हैदराबाद गॅझेटनंतर पेटलेल्या मराठा-ओबीसी वादात अनासपुरेंनी दिलेला ‘समाज एकजुटीचा’ संदेश लक्षवेधी ठरत आहे. राजकीय संघर्ष वाढत असताना त्यांच्या या भाष्याने शांतता आणि सलोख्याचा सूर उमटवला आहे.