Dadasaheb Phalke Award announced : भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना येत्या 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने सामाजिक माध्यम ‘एक्स’वर या निर्णयाची घोषणा केली. मंत्रालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “मोहनलाल यांचा अद्वितीय प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांची प्रतिभा, बहुमुखी भूमिका आणि कठोर परिश्रमांनी भारतीय चित्रपटसृष्टीस नवा सुवर्णमापदंड दिला आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घोषणेनंतर अभिनंदनाचा संदेश देत लिहिले, “मोहनलाल हे उत्कृष्टता आणि बहुविधतेचे प्रतीक आहेत. दशकांपासून चालत आलेल्या त्यांच्या समृद्ध कलाकृतींमुळे ते केवळ मल्याळम चित्रपटसृष्टीतीलच नव्हे, तर भारतीय रंगभूमी आणि सांस्कृतिक परंपरेतील तेजस्वी दीपस्तंभ ठरले आहेत. ते केवळ मल्याळमच नव्हे, तर तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतही लक्षवेधी ठरले आहेत. त्यांच्या कला आणि समर्पणामुळे येणाऱ्या पिढ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.”
मोहनलाल यांचा अभिनय प्रवास मागील चार दशकांहून अधिक काळाचा असून त्यांनी आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे ते केवळ मल्याळमच नव्हे, तर संपूर्ण भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
याआधीही त्यांना भारतीय सरकारने 2001मध्ये पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण या सन्मानांनी गौरवले आहे. गेल्या वर्षी (2022) दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची निवड झाली होती.
भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, कलेची जाण आणि सामाजिक बांधिलकीमुळे मोहनलाल यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या या प्रवासाला नवी उंची लाभली आहे.