Mumbai : गणेशोत्सव हा उत्साह, आनंद आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. मात्र यंदाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना एक मोठे आव्हान समोर आले होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. ही माहिती समजताच पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली. अखेर ही धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत गाठून अटक केली आणि चौकशीत जे समोर आले त्याने सर्वांनाच थक्क करून सोडले.
धमकीचा मेसेज आणि तपासाची सुरुवात
मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीने धमकीचा मेसेज पाठवला. त्यात मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामध्ये स्वतःला दहशतवादी असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. हा संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
आरोपी नोएडातून जेरबंद
तांत्रिक तपास आणि शोध मोहिमेनंतर पोलिसांनी धमकीच्या मागचा सूत्रधार ओळखला. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये राहणाऱ्या ५१ वर्षीय अश्विनी कुमारला बेड्या ठोकण्यात आल्या. तो मूळचा बिहारच्या पाटणाचा रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये वास्तव्यास आहे. अटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्याला मुंबईत आणून कसून चौकशी सुरू केली.
चौकशीत उघडकीस आलेली इनसाइड स्टोरी
आरोपी अश्विनी कुमारने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला. त्याने दिलेल्या कबुलीनुसार, ही धमकी दहशतवादी हेतूने नव्हे तर वैयक्तिक सूडाच्या कारणाने देण्यात आली होती. त्याच्या एका मित्रासोबत मतभेद झाले होते. त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या नावाने धमकीचा संदेश पाठवला, असे कबूल करताना त्याने पोलिसांसमोर गळ घातली.