दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री कोकाटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता .
माणिकराव कोकाटे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त :
माणिकराव यांच्या या व्यक्तव्याने सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. तसेच राजकीय वर्तुळातदेखील मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशातच आता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे ?
जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा.