उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावात शनिवारी ‘जनविश्वास सप्ताहा’अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात राज्याचे कृषिमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विशेष उपस्थिती लावली.
धुळे जिल्ह्यातून आपला नियोजित दौरा रद्द करत कोकाटे थेट शनिमांडळमध्ये दाखल झाले. त्यांच्या अचानक व लवकर आगमनाने राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोडेसे गोंधळले. शिबिरात कोकाटे यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले की, राज्यातील मित्रपक्ष शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे. विशेषतः वळवाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा पिकाबाबत शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी भरपाई मिळालेली नाही, याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
गावात पोहोचल्यावर कोकाटे यांनी शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विशेष पूजा केली. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, "राज्यातील दुष्काळ दूर व्हावा, शेतकऱ्यांच्या अडचणी संपाव्यात आणि जनतेच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत," यासाठी त्यांनी शनैश्वर महाराजांची प्रार्थना केली.
गेल्या काही काळात त्यांच्यावर आलेल्या विविध राजकीय व वैयक्तिक संकटांचा उल्लेख न करता त्यांनी ‘आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटे दूर होवोत’, अशीही विनंती शनिदेवाकडे केली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांच्या कृषिमंत्रीपदावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे कोकाटे यांची ही प्रार्थना राजकीय व वैयक्तिक संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. रविवारी होणाऱ्या जिल्हा दौऱ्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मौन राखणे पसंत केले आणि थेट शनिमंदिर गाठले.