हैद्राबाद गॅझेटीआरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जावेत यासाठी मनोज जरांगे यांनी 3 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये उपोषण केलं होतं. त्यानंतर सरकारने जीआर काढत ही मागणी मान्य देखील केली होती. मात्र ही मागणी मान्य झाल्यानंतर मराठवाड्यातील केवळ 98 अर्जदारांना ओबीसी प्रमाणपत्र दिली गेली आहेत. दुसरीकडे 8 जिल्ह्यातून 594 अर्ज आले आहेत. मात्र त्यातून केवळ 18 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
या जीआरबाबत अर्ज येऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा गैरसमज कुणा पसरवू नये. तसेच सरकारने गतीने हे प्रमाणपत्र द्यावेत. अधिकाऱ्यांनी कोणतीही दिरंगाई करता कामा नये. आम्ही ही लढाई जिंकलेलो आहोत. हैद्राबाद गॅझेटीआरचा जीआर आमच्या हाती आलेला आहे. हे आमचे मोठे यश आहे. तसेच पुढे बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि विखे पाटलांना देखील इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेब यांना माझे सांगणे आहे की, हा जीआर तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी काढलेला आहे. त्यामुळे आधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश तुम्ही द्यावेत की, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. तसेच शिंदे समितीला देखील आदेश द्या की, नोंदी शोधण्याचे काम तातडीने करा. तसेच यावेळी जरांगे यांनी मराठा समाजातील लोकांना देखील लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.