मराठा आरक्षण या मुद्दयामुळे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येतात. मराठा आरक्षणाबरोबरच राजकारणातील इतर विषयांवरदेखील ते बोलताना दिसून येतात. त्यांनी आता नेते धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं गेलं. तसेच करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगीदेखील देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहेत.
धनंजय मुंडे प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनीदेखील त्यांचे मत परखडपणे मांडले आहे. ते म्हणाले की , "करुणा शर्मा यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. त्यादेखील कोणाच्या तरी बहीण आहेत, लेक आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये ". त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी करुणा शर्मा यांना पाठिंबा दर्शवलेला दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे. "लेकीच्या भविष्याची काळजी आहे पण आमच्या मुलांच्या भविष्याची काळजी का नाही?", असा थेट प्रश्न त्यांनी फडणवीसांना केला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुखला धमकी देणाऱ्यासह वाल्मिक कराड व इतर आरोपींना फरारी काळात मदत करणाऱ्यांसह केजच्या पोलिस अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करावे. सर्वांचे महिनाभराचे सीडीआर तपासावेत व या सर्व बाबी चार्जशिटमध्ये याव्यात अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.