मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने आघाडीवर असलेले मनोज जरांगे यांनी मुंबईतील उपोषण संपल्यानंतर पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. त्यांनी मराठा बांधवांना थेट तयारीला लागा, असे स्पष्ट आवाहन केले असून आगामी दसरा मेळाव्याला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईत पाच दिवस चाललेल्या उपोषणादरम्यान हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव थेट आंदोलनासाठी दाखल झाले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मराठा समाजाचा मोठा विजय मानत जरांगे यांनी आता पुढील लढ्याची दिशा दाखवली आहे.
नारायण गडावरील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, शासन निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांना आणि समाजाच्या भविष्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याचे आयोजन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. "जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मेळाव्याला हजेरी लावावी आणि सरकारला आपली ताकद दाखवावी," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिला. "परंपरेनुसार आपला दसरा मेळावा 100 टक्के करायचा आहे. तिथूनच सरकारला आपण काय देतो आणि काय घेऊन जातो हे स्पष्ट होईल," असे ते म्हणाले. तसेच, सध्याच्या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला थेट आरक्षणाचा लाभ होणार असून, काही त्रुटी राहिल्यास सुधारित जीआर काढावा लागेल, याची आठवण त्यांनी सरकारला करून दिली.
तसेच त्यांनी इशारा देत म्हटलं आहे की, "जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला दूध मुंबईचं बंद करू मग काय वाळू खाणार का..." थोडक्यात, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकजूट होऊन आगामी दसरा मेळाव्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले असून, सरकारला सावधही केले आहे.