मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा एल्गार केला आहे. आज, बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून त्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर 29 तारखेपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे आज जाहीर केले. एकतर विजयाचा रथ येईल किंवा अंत्ययात्रेचा; असा निर्धार जरांगेंनी यावेळी व्यक्त केला आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने शब्द दिला होता. पण आता ते विसरत आहेत. मराठ्यांनीच ही सत्ता मिळवून दिलेली आहे. जातीसाठी मी मरायला भीत नाही. मुंबईत त्यासाठीच येतोय, माझ्यावर हल्ला करायचा प्लॅन असेल तर मीच मुंबईत येतोय. जे आंदोलन आंतरवलीत होणार आहे, तेच मुंबईतही होणार आहे. 29ऑगस्टला हे आंदोलन होईल. 28 ला मला सोडायला मुलं येतील, त्यानंतर 29 तारखेला ते माघारी शेतीतली कामं करतील. माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीच खैर करणार नाही. मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे. 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.