थोडक्यात
दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करणार
मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रकृती अस्वस्थ आहेत.
राज्यात आज पाच दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहे. यात मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक नारायणगडावर आयोजित करण्यात आला आहे. राज्यात एका बाजूला शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन सुरू असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्यापूर्वीच शेतकऱ्यांबद्दल एक विधान केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या लढ्याची सर्वात मोठी घोषणा या मेळाव्यातून करणार असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करणार
मनोज जरांगे पाटील हे सध्या प्रकृती अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली सध्याची स्थिती स्पष्ट केली. मला उभे राहता येत नाही, त्यामुळे मी भाषण करेन की नाही, हे सांगू शकत नाही,” असे विधान जरांगे पाटील यांनी केले. पण मी गडावर जाऊन मंदिरात बसून चर्चा करणार आहे, तसेच याच ठिकाणाहून मी शेतकऱ्यांसाठी लढ्याची मोठी घोषणा करेन. वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल, एवढी मोठी घोषणा मी आज करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी नुकत्याच निघालेल्या जीआरचे महत्त्व सांगितले. हा जीआर निघाला आहे. यामुळे मराठा समाजाला ७० वर्षांतील सर्वात मोठा फायदा झाला आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील आरक्षणात सामील करणार आहोत, असेही विधान जरांगे यांनी केले.
जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नारायणगडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बीड पोलिसांनी संपूर्ण स्टेजची तपासणी केली आहे. बॉम्ब स्कॉड पथकाकडून परिसराची कसून पाहणी करण्यात आली आहे. तसेच जरांगे पाटील जिथे भाषण करणार आहेत, त्या स्टेजची झाडाझडती घेण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील हे दुपारपर्यंत गडावर दाखल होतील. त्यांच्या प्रकृतीमुळे, ते दुपारी ॲम्ब्युलन्समधून गडावर दाखल होणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली.
दरम्यान सध्या दसरा मेळाव्यासाठी हजारो मराठा आंदोलक आणि समर्थक गडावर जमले असून, त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. वेळप्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू, पण शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा मी आज करणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता या मेळाव्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.