मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ते आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगेंचा हा उपोषणाचा आठवा टप्पा आहे, त्यांनी या आधी सात टप्प्यात उपोषण केलं. जरांगेंनी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांनी दीड वर्षाचा लेखाजोखा मांडत संताप व्यक्त केला. तसंच मुख्यमंत्री मराठ्यांशी बेईमानी करणार नाही, ते मराठ्यांना आरक्षण देणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. जुन्याच मागण्या आम्ही नव्याने करतोय. सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा. तातडीने हैदराबाद गॅजेट लागू करावं. शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्यावी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशी द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
महाराष्ट्रात कधी घडलं नसेल असं मराठ्यांच्या बाबतीत घडलं आहे. सरकारला एकवर्षे लागत आहे का गोरगरिब मराठ्यांना न्याय द्यायला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या त्यांच्या मागणीचा पुनरूच्चार त्यांनी केला आहे. जीआर काढून मराठ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करावं.
आमची दुसरी मागणी ही की, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीने करावी. सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ज्याची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ आणि वंशावळ समिती पुन्हा गठित करावी. समितीतील मनुष्यबळ वाढवा. ताबडतोब प्रमाणपत्र द्यायचे. सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यायचे.
हैदराबाद गॅझेट, सातारा, बॉम्बे, आणि औंध सरकारचं गॅझेट तातडीने लागू करा.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना सरकारने अद्याप निधी दिला नाही. त्यांना तातडीने नोकरीत सामावून घ्या. अशा ८ ते ९ मागण्या केल्या आहेत त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, असे जरांगे पाटील म्हणाले.
संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत लढणार - जरांगे
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांची क्रूर हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय द्या. संतोष भैय्याला आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय आहेत. त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. संतोष भयाला आणि करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही. मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं की नाही हा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.