राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी राहणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
तसेच, ज्या शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या शाळांना शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजीही सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांमधील नियमित अध्यापन बंद राहणार आहे. मात्र, ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी करण्यात आलेली नाही, अशा शाळा शुक्रवारी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मतदान पथकात नियुक्त केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरून निवडणूक साहित्य स्वीकारावे आणि नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्ष आणि उमेदवारांची लगबग वाढली आहे.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्ष आणि उमेदवारांची लगबग वाढली आहे. दरम्यान, मतदारांसाठी ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती घरबसल्या मिळणार आहे. तसेच mahasecvoterlist.in या संकेतस्थळावरूनही ही माहिती तपासता येणार आहे.