मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने संताप व्यक्त करत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना शुक्रवारी धाराशिव रेस्ट हाऊसजवळ घेराव घातला. अर्जदारांकडे कुणबी असल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही प्रमाणपत्र दिले जात नसल्याने आंदोलकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी थेट रेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वारावरच "प्रश्न सोडवा, मगच आत जा" असा आक्रमक इशारा देत रास्ता अडवला.
जवळपास 10 ते 15 मिनिटे आंदोलन सुरू राहिले. यावेळी आंदोलक आणि मंत्री सरनाईक यांच्यात तणावपूर्ण शाब्दिक वाद झाला. मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार, अर्ज सादर करताना सर्व आवश्यक पुरावे दिलेले असूनही जात वैधता समितीकडून प्रमाणपत्र नाकारले जात आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिष्यवृत्ती प्रक्रियेमध्ये नुकसान होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
घटनेनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित जात वैधता समितीच्या अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. “पूर्वीही दोन वेळा आपणाशी संपर्क साधला होता. निर्णयाची वाट पाहत सुमारे दीड महिना उलटून गेला तरी काहीच कृती झाली नाही,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावत सांगितले की, "जर तुमच्या कामकाजामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींना अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर याची जबाबदारी तुमच्यावरच येते. आता वेळ न दवडता नियमांनुसार कार्यवाही करा."