मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
"आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही मुंबई गाठू!"
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, "आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला थांबवणं शक्य होणार नाही. "ते पुढे म्हणाले, "हे सरकारही जाणून आहे की, केवळ ८-९ टक्केच मराठा आरक्षण शिल्लक आहे. आता वेळ आली आहे निर्णायक निर्णयाची!"
राजकीय मराठ्यांना आह्वान: गुलालासाठी सज्ज व्हा
"कोणत्याही राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या लेकरांच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी सज्ज राहावं. ही लढाई आपल्या अस्मितेची आहे," असं म्हणत त्यांनी सर्वपक्षीय मराठा नेत्यांना अप्रत्यक्ष संदेश दिला. या बैठकीदरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’, ‘लढेंगे जितेंगे हम सब जरांगे’, ‘कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला’ अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी रात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंदोलकांचे मागणीनिवेदन स्वीकारले व आपली सहानुभूती व्यक्त केली. "मी सुरुवातीपासून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवला आहे. एकनाथ शिंदे मुखमंत्री असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला १०% आरक्षण दिले आहे. उर्वरित मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील," असं आठवले यांनी सांगितलं.
ही लढाई आता आरपारची - मनोज जरांगे
“तुमचं बळ पाहून मी नतमस्तक होतो. जातीसाठी इतक्या निर्धाराने संघर्ष करताना तुम्ही संपूर्ण देशाला दाखवून दिलं की, लढा फक्त आरक्षणाचा नाही – तो आत्मसन्मानाचा आहे,” असे म्हणत जरांगे यांनी आरपारच्या लढ्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले, “आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही. जिंकल्याशिवाय थांबणार नाही.”