मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत आज अचानक बिघाड झाला. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, सकाळपासून मराठा समाजाच्या बैठकीत व्यस्त असलेल्या जरांगे पाटील यांना बैठकीदरम्यान चक्कर आली. तातडीने त्यांना नांदेडच्या विश्रामगृहात हलवण्यात आले असून, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत, मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आवाहन केले आहे. “मोर्चा मुंबईत आल्यावर काहीही झाले तरी मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याच मोर्चाची तयारी करण्यासाठी ते नांदेड दौऱ्यावर आले होते. सकाळपासून सलग बैठकांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला.
दरम्यान, बैठकीदरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या मराठा बांधवांच्या गर्दीत चोरट्यांनी पाकिटमारीचा सपाटा लावला. अनेकांकडून पाकिटे व रोख रक्कम लंपास केल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यापैकी एक चोरटा उपस्थितांच्या हाती लागला. संतप्त जमावाने त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
29 ऑगस्टच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेवर ताण येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिस व प्रशासनाकडून सुरक्षेचे नियोजन सुरू झाले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.