मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या मराठी भाषा विभागाकडून झालेली चूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धे’च्या जाहिरातीत ‘भाषा’ हा शब्द चक्क ‘भाशा’ असा चुकीचा लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही जाहिरात स्वतः मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ही बाब अधिकच लाजिरवाणी ठरत आहे.
सदर जाहिरात मराठी भाषा विभागाच्या नावाखाली प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये ‘मराठी भाषा विभाग’ ऐवजी ‘मराठी भाशा विभाग’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, प्रसारासाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या विभागाकडूनच अशी गंभीर चूक होणे, यावरून प्रशासकीय दुर्लक्षाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही या जाहिरातीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत संकेतस्थळ www.marathivishwakosh.org वर ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धे’साठी नोंदणीची लिंक प्रसिद्ध करण्यात आली होती. ही नोंदणी प्रक्रिया ११ डिसेंबर २०२५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू होती. विद्यार्थ्यांमध्ये व मराठीप्रेमींमध्ये ज्ञानवृद्धी व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मात्र, अशा महत्त्वाच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीमध्येच मराठी भाषेची मूलभूत शुद्धता न राखली जाणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. मराठी भाषा विभागाकडून अपेक्षा असते की, कोणतीही जाहिरात किंवा अधिकृत दस्तऐवज प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची भाषिक तपासणी काटेकोरपणे केली जावी. पण प्रत्यक्षात ‘भाषा’सारखा मूलभूत शब्द चुकीचा लिहिला गेल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठी भाषेच्या अभिमानाच्या गप्पा करणाऱ्या प्रशासनाने आधी स्वतःच्या कागदपत्रांमध्ये तरी शुद्ध लेखनाची काळजी घ्यावी, अशी मागणी आता साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि मराठीप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणात संबंधित विभागाकडून खुलासा केला जाणार का आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.