ताज्या बातम्या

Marathi Language Controversy : विमानात मराठीवरून वाद; मुंबईकर महिलेनं यूट्यूबरला सुनावलं, अखेर माफी मागत माही खानचा यू-टर्न

एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई प्रवासादरम्यान मराठी भाषेवरून मोठा वाद उसळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेत मुंबईत वास्तव्यास असलेल्या मुग्धा मजुमदार या महिला प्रवासी आणि यूट्यूबर माही खान यांच्यात जोरदार वाद झाला.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • विमानात नेमकं काय घडलं?

  • सोशल मीडियावर गोंधळ, नोकरीचा राजीनामा

  • मनसेच्या हस्तक्षेपानंतर माफी

एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई प्रवासादरम्यान मराठी भाषेवरून मोठा वाद उसळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेत मुंबईत वास्तव्यास असलेल्या मुग्धा मजुमदार या महिला प्रवासी आणि यूट्यूबर माही खान यांच्यात जोरदार वाद झाला. मराठी बोलण्यास नकार देत माही खानने विमानात अरेरावी केली, तर त्यानंतर सोशल मीडियावरून मुग्धा यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न केला. अखेर या प्रकरणात माही खानने माफी मागत आपला व्हिडिओ डिलीट केला आहे.

विमानात नेमकं काय घडलं?

२३ ऑक्टोबर रोजी कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-676 या विमानात हा प्रकार घडला. प्रवासादरम्यान मुग्धा मजुमदार चहा घेत असताना, त्यांच्या पुढच्या सीटवर बसलेल्या माही खानने अचानक सीट मागे घेतली. त्यामुळे त्यांच्या हातातील चहा आणि ट्रेवरील जेवण सांडले. मुग्धा यांनी तत्काळ “भाऊ, हळू हळू…” असे मराठीत सांगितले.

यावर माही खाननेच उलट त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. मुग्धा यांनी शांतपणे सांगितले, “मुंबईत राहतोस तर तुला मराठी बोलता आली पाहिजे.” मात्र, त्यावर माही खानने “मी मराठी बोलणार नाही,” अशी हट्टी भूमिका घेतली. नंतर त्याने “मुंबईत मराठी आलीच पाहिजे, ही कसली मानसिकता?” असा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.

सोशल मीडियावर गोंधळ, नोकरीचा राजीनामा

माही खानचा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओत त्याने मुग्धा मजुमदार यांच्या कंपनी ह्युंदाई मोटर्सलाही टॅग केले होते. त्यामुळे कंपनीच्या प्रतिमेवर परिणाम होईल या भीतीने मुग्धा यांना सोशल मीडियावरून टीका आणि धमक्या मिळू लागल्या.

या मानसिक तणावातून मुग्धा यांनी अखेर नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्या मूळच्या पश्चिम बंगालमधील असून, अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्या मराठी भाषा उत्तमरीत्या बोलतात आणि मुंबईच्या संस्कृतीशी एकरूप झालेल्या आहेत.

मनसेच्या हस्तक्षेपानंतर माफी

प्रकरण उघड झाल्यानंतर मुग्धा मजुमदार यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी माही खानला इशारा दिल्यानंतर त्याने २४ तासांच्या आत सोशल मीडियावरून माफी मागितली आणि संबंधित व्हिडिओ डिलीट केला.

आपल्या माफीनाम्यात माही खान म्हणाला, “मी तीन दिवसांपूर्वी जो व्हिडिओ टाकला होता, तो काढून टाकला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी कोणत्याही भाषेविरोधात नाही. माझ्या बोलण्यामुळे कुणाला वाईट वाटले असेल, तर मी माफी मागतो. मुंबई मेरी जान है... जय महाराष्ट्र!”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा