थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त मराठी माणसा, जागा आहेस ना? झोपलास तर संपलास! जागा रहा!"म्हणत सामनातून अग्रलेख , मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर अग्रेलखावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. नेमकं काय आहे अग्रलेखात पाहूया
सामना अग्रलेख...
महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राजकारणाची शोकांतिका करण्याचे प्रयत्न हर तन्हेने केले जात आहेत. मात्र उद्धव आणि राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. शिवतीर्थावर विसावलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला 'एकी'चा संदेश दिला. ती एकी हीच हिंदुहृदयसम्राटांना खरी मानवंदना ठरेल. मुंबई-महाराष्ट्रात मराठी एकजुटीचाच विजय होईल. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातले असामान्य पुरुष होते. या पुरुष सिंहाने देशाच्या राजकारणातले महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी माणूस हा जगात कोठेही गेला तरी 'मराठी' म्हणून त्याच्यातला आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी जागा केला. त्याच मराठी माणसाला बाळासाहेब आज विचारीत आहेत, "जय महाराष्ट्र! मराठी माणसा, जागा आहेस ना? झोपलास तर संपलास! जागा रहा!"
भारतात एकंदरीत जे अराजक माजले आहे ते पाहता देशाच्या कोट्यवधी जनतेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण रोजच येत आहे. बिहारच्या विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो जिता वोही सिकंदर." आज बाळासाहेब असते तर त्यांनी "कोण हा सिकंदर? तो नव्या हिंदुत्ववाल्यांचा नवा बाप आहे काय? महाराष्ट्राचा, देशाचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सिकंदर फार तर भाजपचा बाप असेल," अशा शब्दांत खिल्ली उडवली असती. मोदी-शहा यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांना बिहारमध्ये महिलांची मते विकत घेतली. महाराष्ट्रात ही मते फक्त दीड हजारात विकत घेतली व 'जीत मय्यांचे ढोल हे लोक हिंदुत्वाच्या नावाने पिटत आहेत. हिंदुहृदयसम्राटांना मान्य होणारे हिंदुत्व हे नाहीच. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व काय व कसे होते ते जम्मू-कश्मीरच्या 'पंडितां'च्या अंतरंगात जाऊन पाहायला हवे. गृहमंत्री शहा म्हणतात, "आम्ही दहशतवाद संपवत कश्मीरचा प्रश्न मिटवला." त्यांचे शब्द तोंडातून बाहेर पडत असतानाच श्रीनगरच्या पोलीस स्टेशनात बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी नऊ जणांचे बळी घेतले. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून 15 जणांचे प्राण घेतले. त्याआधी पुलवामा, पहलगाम घडले. कश्मीरात हिंदू पंडितांची घरवापसी झाली नाही. पंडित मंडळी रोज हिंदुहृदयसम्राटांच्या नावाने धावा करत आहेत. हिंदू पंडितांचे एकमेव तारणहार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हिंदू पंडितांचे चिलखत होते. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा सुरळीत पार पाडाव्यात व हिंदूंच्या केसालाही धक्का लागू नये म्हणून हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पाकड्या दहशतवाद्यांना अंगावर घेऊन त्यांना नामोहरम करत होते.