यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात होणार आहे. पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. स्थळ निवड समितीने 5 ते 7 जून दरम्यान काही ठिकाणी भेटी दिल्यानंतर साताऱ्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांना संयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
साताऱ्यात हे चौथे साहित्य संमेलन आहे. यापूर्वी 1905 मध्ये रघुनाथ पांडुकर करंदीकर, 1962 मध्ये नवी गाडगीळ, आणि 1993 मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलने झाली होती. त्यामुळे हे संमेलन ऐतिहासिक परंपरेचा भाग ठरणार आहे.
यावर्षीचे संमेलन छत्रपती शाहू स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहे. हे मैदान 14 एकर परिसरात असून, 25,000 प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आहे. मुख्य आणि दोन उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, गझल कट्टा, कविसंमेलने, चर्चासत्रे, भोजन व्यवस्था आणि पार्किंगसाठी 8 एकर पोलिस परेड ग्राउंडचा वापर केला जाणार आहे.
या संमेलनाच्या तयारीसाठी मार्गदर्शन समितीही स्थापन करण्यात आली असून, प्रा. मिलिंद जोशी, गुरुय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रदीप दाते आणि दादा गोरे यांचा समावेश आहे.
गेल्या बारा वर्षांपासून साताऱ्यात संमेलन होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा उत्सव म्हणून हे संमेलन राज्यभरातून आणि देशभरातून साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि अभ्यासकांना एकत्र आणणारे ठरणार आहे.