थोडक्यात
मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे.
बीड, धाराशिव, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये रात्रीभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले
बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्हा परिषदेच्या शाळा पाण्याखाली गेल्या आहेत
Marathawada Rain Update : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. बीड, धाराशिव, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये रात्रीभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्हा परिषदेच्या शाळा पाण्याखाली गेल्या आहेत. माजलगाव तालुक्यातील बडेवाडी शाळेला तर तळ्यासारखे स्वरूप आले आहे. वर्गातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांना अघोषित सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत. ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. पिके कमरेइतक्या पाण्यात बुडाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. सरकारकडे कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काजळा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क खंडित झाला आहे. कळंब तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
लातूर जिल्ह्यात मांजरा, तेरणा, रेणा आणि तावरजा नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांजवळील पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लातूर–बिदर–हैदराबाद महामार्गासह अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, माढा परिसरात तब्बल 74 हजार हेक्टर पिके पाण्याखाली गेली असून शेकडो घरांची पडझड झाली आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून विस्थापित शिबिरात त्यांचा तात्पुरता आश्रय घेतला जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.