भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील एकूण २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, हवामानातील अचानक बदल लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून, विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर थांबणे टाळावे, आवश्यक नसल्यास प्रवास न करणे, तसेच वीज पडण्याच्या शक्यतेमुळे सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे महत्त्वाचे ठरेल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मच्छीमारांना समुद्र खवळलेला राहणार असल्याने पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात यंदाच्या जून महिन्यात सरासरीच्या 112 टक्के पावसाची शक्यता आहे. ही पावसाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य वेळ निवडण्याचे आणि स्थानिक हवामानाच्या आधारेच शेतीविषयक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय हवामान अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच वादळी पावसाच्या सरी पडू शकतात. तर काही ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32°C ते 35°C दरम्यान राहील, असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हवामानातील बदल आणि संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता, कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.