डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने भौतिक सुविधांचा अभाव आणि प्राध्यापकांच्या अनुपस्थितीमुळे 113 पदव्युत्तर महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले होते. या महाविद्यालयांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सुरुवातीला 28 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध संस्थाचालकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केल्यानंतर विद्यापीठाने ती स्वीकारून आता 5 ऑगस्ट 2025 पर्यंत कागदपत्रे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कारवाई केवळ नवोदित महाविद्यालयांपुरती मर्यादित नसून, नामांकित आणि अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थांनाही लागू करण्यात आली आहे. प्रवेश परवानगी मिळवण्यासाठी सर्वच महाविद्यालयांना आवश्यक भौतिक सुविधा, प्राध्यापकांची उपस्थिती आणि गुणवत्ता निकषांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे मुदतवाढ ही केवळ कागदपत्र सादर करण्यासाठीची संधी असून, मूल्यांकन प्रक्रियेत कोणताही बदल किंवा शिथिलता ठेवली जाणार नाही.
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे संबंधित महाविद्यालयांना आवश्यक सुधारणा करण्याची अंतिम संधी मिळाली असून, ठरवलेल्या निकषांची पूर्तता न झाल्यास प्रवेश परवानगी नाकारण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा