भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असतात. यावेळी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐवजी एका महिलेने या नोबेल पुरस्कारावर आपल नाव कोरलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी अनेकदा जीवाचा आटापीटा केल्याचं पाहायला मिळाल. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 338 उमेदवार रिंगणात होते. यात ट्र्म्प यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते.
त्याचसोबत नोबल पुरस्कारापुर्वी ज्या देशांमध्ये युद्ध झाली त्या युद्धांमध्ये ट्रम्प यांनीच मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी स्वत: केला होता. यावर अनेक देशांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली होती. मात्र यंदा नोबेल पुरस्कारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. यंदाचा नोबेल शांती पुरस्कार 10 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला.
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पार पडलेल्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी व्हेनेझुएलातील आयरन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना सन्मानित केले गेले आहे. यावेळी शांततेच्या नोबेल पुरस्काराबाबत नोबेल समितीने स्पष्ट केले की, लोकशाही हक्कांसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, हुकूमशाहीपासून शांततापूर्ण लोकशाहीकडे संक्रमण करण्यासाठीच्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे.
त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निराशाच झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार पुरस्कार मिळावा यासाठी आठ देशांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये पाकिस्तान आणि इस्रायल व्यतिरिक्त अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे. मात्र यात मारिया कोरिना मचाडो यांनी बाजी मारली आहे.