पूर्व अफगाणिस्तानात रविवारी उशिरा रात्री 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळील भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने सांगितले. हादऱ्यांमुळे शेकडो घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. स्थानिक प्रशासनानुसार, 622 जणांचा मृत्यू झाला असून 1500 हून अधिक लोक जखमी आहेत.
भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के अफगाणिस्तानपुरते मर्यादित राहिले नाहीत. भारतातील दिल्ली-एनसीआरसह उत्तरेकडील काही भागांत आणि पाकिस्तानातही झटके जाणवले. पहिल्या धक्क्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत आणखी एक भूकंप झाला, ज्याची तीव्रता 4.5 होती. सततच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तान हा भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील देश मानला जातो. मागील एका महिन्यात हा 5वा भूकंप आहे. ऑगस्ट महिन्यात 4.2 ते 5.4 तीव्रतेचे अनेक भूकंप झाले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही 6.3 तीव्रतेच्या भूकंपाने अफगाणिस्तान हादरला होता, ज्यात हजारो लोकांचा बळी गेला होता. यावरून या देशातील नैसर्गिक आपत्ती किती गंभीर स्वरूपात उद्भवू शकतात हे स्पष्ट होते.
भूकंपाची तीव्रता साधारणतः रिक्टर स्केलवर मोजली जाते. या स्केलवर 1 ते 9 या दरम्यान भूकंपाची शक्ती मोजली जाते. एखाद्या भूकंपाच्या वेळी जमिनीतून निघणारी ऊर्जा, तिचे केंद्र (एपिसेंटर) आणि खोली यावरून त्याची तीव्रता निश्चित केली जाते. जितकी तीव्रता जास्त, तितका भूकंपाचा परिणाम आणि हानी गंभीर मानली जाते.
सध्या अफगाणिस्तानात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक, बचाव पथके आणि आंतरराष्ट्रीय मदतसंस्था कार्यरत आहेत. मात्र दुर्गम भागांमध्ये रस्ते व संचार व्यवस्था खंडित झाल्याने मदत पोहोचवणे कठीण झाले आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.