डोंबिवलीतील एमआयडीसी फेज 1 मधील ऐरोसेल गारमेंट कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यामध्ये सध्यातरी सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे. डोंबिवली भागातील एमआयडीसी फेज वनमध्ये आगीचे तांडव पाहायला मिळाले. एमआयडीसी फेज वन मधील विश्वनाथ गारमेंट कंपनीला अचानक दुपारच्या सुमारास आग लागली.
त्यानंतर ही आग एरोसेल कंपनीपर्यंत पसरत गेली. या घटनेमुळे त्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रत्येकजण आपल्या बचावासाठी सैरावैरा धावू लागला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत दोन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून कंपनीच्या आत काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप हाती आली नसून त्याचा शोध सध्या सुरु आहे.
विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. याच कंपनीला सर्वात पहिले आग लागल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ती आग पसरत जाऊन एरोसेल कंपनीने सुद्धा यात पेट घेतला. सध्या यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये याआधीही अनेकवेळा अश्या आगीच्या घटना घडल्या असून त्यामुळे या कंपन्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली होती, ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.