छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या भव्य ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाळुज परिसरात स्थित या हॉटेलमध्ये आज, गुरुवारी सायंकाळी ८.३० च्या सुमारात ही आग लागली. संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या हॉटेलचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. शहराच्या बाहेर असलेल्या या हॉटेलची रचना अत्यंत भव्य आहे. हे हॉटेल परिसरातील प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक मानले जाते. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बाहेर पडून स्वतःचे प्राण वाचवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेल पूर्णपणे आगीच्या कवेत गेल्याने आटोक्यात आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. आग इतकी भीषण होती की, पाहता क्षणी संपूर्ण हॉटेल लालबुंद होऊन गेले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये आगीचे भयंकर दृश्य स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण आणि संभाव्य संशयास्पद बाबींची चौकशी सुरू आहे. या आगीत हॉटेलमधील अंतर्गत संरचना, फर्निचर, विद्युत साहित्य आणि अन्य उपकरणे पूर्णतः जळून खाक झाली आहेत.