होळीच्या दिवशी होलिकेत आपण दुःख, द्वेष आणि राग यांना जाळून टाकतो. पण याच होलिकेच्या आगीने मुंबईमध्ये होळीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. मुंबईतील बोरिवली परिसरात असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला असणाऱ्या दहिसरमध्ये धुलीवंदनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तळीरामांनी होळी साजरी करत असताना राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये आग लावली असा अंदाज आहे.
शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रीय उद्यानात आगीचा वनवा लागल्याचे म्हटले जात होते. ही आग हळू हळू जंगलामध्ये सगळीकडे पसरत गेली. पण नंतर हा वनवा नसून जंगलाला आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या आणि राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग अटोक्यात आणण्यात यश मिळाले. या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.