सध्या सर्वत्र आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लायवूड, रेग्जिन, फोम तसेच सोल्यूशनचा साठा असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात वाढली.
आगची माहिती मिळताच भिवंडी येथील दोन तर कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी इमारती मधील 12 गोदाम आली असून आगीच्या ज्वालांनी क्षतिग्रस्त होत इमारतीचा बराचसा भाग कोसळला आहे.
सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग विझवण्याच्या प्रयत्नात हरिश्चंद्र वाघ या अग्निशमन दलाच्या जवानाला किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भागात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने आणि आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने तिला पूर्णपणे विझवण्यासाठी किमान 12 तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे