पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबाने केलेल्या छळाला कंटाळून सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. तिच्या मृत्यूनंतर राजकीय, सामाजिक स्तरातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. वैष्णवीच्या आई-वडिलांनी तक्रार केल्यानंतर वैष्णवीचे पती शशांक, सासू आणि नणंद यांनी पोलिसांनी अटक केली. तर आज, शुक्रवारी सात दिवसानंतर वैष्णवीचे फरार सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांनी अटक करण्यात बावधान पोलिसांना यश आले. दरम्यान, वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिंन काल, बुधवारी माध्यमांसमोर येत आपल्यालाही हगवणे कुटुंबाच्या त्रासाचा सामना करावा लागल्याचे तिने म्हटले. मयुरीनं तिच्या मारहाणीचे फोटो माध्यमांसमोर जाहीर केले. तर आज मयुरीचे पती सुशील आणि सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.
दोघांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमांनी मयुरीशी संवाद साधला असता, "मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवीसोबत अस घडलं नसतं," अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, "वैष्णवीला त्रास देणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे," असे म्हटले आहे.