राज्यातील एमबीबीएस परीक्षांमध्ये मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रश्नपत्रिका लीक होण्याचे प्रमाण वाढत असल्याने आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ई-मेलने प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचा ठरविला आहे. नेमका कशा मुळे हा निर्णय घेण्यात आला? गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये चारही पेपरमध्ये पेपर फुटल्याच्या तक्रारी समोर आल्याने, पेपर बदलण्याची वेळ आरोग्य विज्ञान विद्यापीठावर आली. तर काही ठिकाणी पुनर्परीक्षा घेण्याची वेळ देखील आल्याने आता ईमेल द्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी आल्याने परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत आणि विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पेपर लीक झाल्याच्या या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने म्हसरूळ पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही पेपर लीक होत असल्याने विद्यापीठातच काहीतरी गडबड असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असली तरी या प्रकारामुळे लष्करी शिस्तीत चालणाऱ्या आरोग्य विद्यापीठात अशी गंभीर चूक कशी घडली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ई-मेलने नवीन प्रश्नपत्रिका पाठवून त्या तातडीने प्रिंटिंग करून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येतील. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या या कालावधीत हा उपक्रम पार पाडवा लागणार असल्याने, यासाठी एक ते दीड तास विद्यार्थ्यांना उशीर होऊ शकतो याविषयी मानसिक तयारीचे आवाहन देखील विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.
पेपर फुटी प्रकरणावरून प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
पेपर फुटी प्रकरणावरून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील एमबीबीएस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर मनस्ताप झाल्याने आता विद्यापीठाने ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेतल्याने पेपर फुटीचा प्रकरण कमी होईल विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.