नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किमी अंतरावरील उलवे परिसरात मांसविक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली होती. या तक्रारीची आता दखल घेण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत मांस विक्री बंद करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आला आहे. मांसविक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पर्यावरणप्रेमींनी केलेल्या तक्रारीत मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी असे अनेक पक्षी आकर्षित होतात आणि हे खाण्यासाठी परिसरात येतात. त्यामुळे विमान उड्डाणास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांसविक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.