थोडक्यात
मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉक
हजारो नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता
३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉकची मालिका सुरु आहे. याचा थेट परिणाम आता लोकल सेवेवर होत आहे. या कामासाठी ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात नेरळ-कर्जत आणि खोपोली-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत. या बदलांमुळे या उपनगरीय मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डाच्या पुनर्रचनेसाठी हे महत्त्वपूर्ण प्री नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात आले आहे. आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ६ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यानंतर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० पर्यंत मेगाब्लॉक असेल. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत यार्डापर्यंत असणार आहे. यानुसार ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.
दरम्यान ब्लॉकच्या काळात उपनगरीय रेवेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार ३ ऑक्टोबरला नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध असणार नाही. तसेच ४ आणि १० ऑक्टोबर यादरम्यान कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच कर्जत-खोपोली मार्गावर अवलंबून असलेल्या प्रवाशांना ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः ३ ऑक्टोबर रोजी नेरळ-कर्जत मार्ग बंद असल्याने या भागातील प्रवाशांना नेरळहून पुढे एसटी बस, खासगी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.