मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील रेल्वे रूळांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी शनिवार 4 ऑक्टोबर ते आज रविवारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना असं सूचित करण्यात येते की, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. भायखळा स्थानकावर तांत्रिक कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. त्याचबरोबर विविध देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर आज रविवारी देखील ब्लॉक घेण्यात आला आहे.
दरम्यान माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत असणार असून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 10.14 ते 15.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवून शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबवल्या जातील.
तसेच मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जाणार असून या गाड्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. तर दुसरीकडे ठाण्यावरुन 11.07 ते 15.51 अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या सेवा देखील 15 ते 20 मिनिटे उशिरा पोहोचतील.
त्याचसोबत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर देखील शनिवारी रात्री पासून ते आज रविवार दुपारपर्यंत मेगाब्लॉक सुरू राहणार आहे. यावेळी पनवेल ते वाशी या मार्गावरील स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून ते 4 वाजून 5 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूझ दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 1 पासून ते आज रविवार पहाटे 4.30 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.