भारतामध्ये यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला होता, तसेच मान्सूनचे प्रमाण देखील यंदा सरासरीपेक्षा जास्त राहिले, याचा मोठा फटका हा देशातील अनेक राज्यांना बसला, महाराष्ट्राला देखील पावसानं झोडपून काढलं. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा जोरदार पाऊस झाला, पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागात मोठं नुकसान झालं, ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावरून घेतला, अनेकांची घरं वाहून गेली. दरम्यान आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानुसार दक्षिण अंदमानमधील समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 24 नोव्हेंबरच्या आसपास हा पट्टा बंगालच्या उपसागराकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तांसामध्ये तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, आणि ओडिशा या राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात गारठा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, या राज्यांमध्ये थंडीची लाट येणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान देशात आता समिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे, काही भागांमध्ये हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. महाराष्ट्रात तापमान कमी होणार असून, गारठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.