गणपती बाप्पाला प्रिय असणारी आणि सहज उपलब्ध होणारी दुर्वा ही केवळ धार्मिक पूजेसाठीच नव्हे, तर केसांसाठीही अमूल्य औषधी वनस्पती ठरते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सऐवजी दुर्वा या नैसर्गिक उपायाने केसांची गळती थांबवता येते, केसांना पोषण देता येते आणि ते अधिक मजबूत, जाडसर व चमकदार बनवता येतात.
दुर्वा ही वनस्पती पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A आणि C या पोषक घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे टाळूवरील सूज कमी करतात आणि केसांना बाह्य धक्यांपासून संरक्षण देतात. त्यामुळे दुर्वा हे एक प्रभावी नैसर्गिक टॉनिक मानले जाते, जे केसांची वाढ वाढवते आणि कोंड्यासारख्या समस्या दूर करते.
दुर्वाचा घरगुती हेअर मास्क बनवणे अतिशय सोपे आहे. प्रथम ताजी आणि स्वच्छ धुतलेली दुर्वा मिक्सरमध्ये थोड्याशा पाण्यासह वाटून घ्या. तयार पेस्टमध्ये खोबरेल तेल किंवा एलोवेरा जेल मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून स्काल्पवर लावा आणि हलक्या हाताने ५-१० मिनिटे मालिश करा. २०-३० मिनिटांनंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवून टाका.
आठवड्यातून २-३ वेळा हा मास्क लावल्यास केसांची मुळे बळकट होतात, गळती कमी होते आणि कोंड्यावर नियंत्रण मिळते. स्काल्पला आवश्यक आर्द्रता मिळते आणि विशेषतः कोरडी, खवखवीत त्वचा असणाऱ्यांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. काही आठवड्यांतच केस अधिक जाडसर, चमकदार आणि लवचिक दिसू लागतात. दुर्वेचा नियमित वापर केल्यास केस गळतीवर नियंत्रण मिळते, टाळूवरची खाज, कोंडा आणि त्वचारोगांपासून मुक्ती मिळते. सौंदर्यसंपन्न, निरोगी केसांसाठी हा एक आजीबाईंचा परंपरागत पण अत्यंत प्रभावी असा उपाय ठरतो.
टीप: वरील माहिती ही केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. त्वचेसंबंधी किंवा केसांच्या गंभीर समस्यांसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. या उपायांची अचूक परिणामकारकता व्यक्तिपरत्वे वेगळी असू शकते. लोकशाही मराठी या उपायांची हमी देत नाही.