रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एक अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लागला असून, यामुळे दुर्गराज रायगडाच्या वास्तूरचनेमागील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतो आहे. रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्त्व विभागच्या संयुक्त उत्खनन मोहिमे दरम्यान कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे.
हे उपकरण प्राचीनकाळी आकाशातील ग्रह-तारे निरीक्षण, दिशांचे मापन आणि कालगणना यासाठी वापरले जाई. यंत्रावर ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशा अक्षरांच्या कोरीव खूणा आणि सर्पाकृती आकृती आढळून आल्या आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, बांधकामाच्या वेळी उत्तर-दक्षिण दिशांचे अचूक भान ठेवून वास्तुविशेषांचे नियोजन झाले असावे.
गेल्या काही वर्षांपासून रोपवे स्टेशन, कुशावर्त तलाव, बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खनन कार्यातून सुमारे १०–१२ ठिकाणी विविध पुरावे समोर आले आहेत. यंत्रराजाचा सापडलेला नमुना हा त्या सर्व पुराव्यांत अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा ऐतिहासिक शोध रायगडाच्या अभिजाततेला नव्याने उजाळा देतो आहे. यामुळे भारतीय खगोलशास्त्र आणि वास्तुशास्त्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा संदर्भ मिळतो, जो अभ्यासक आणि संशोधकांसाठी अतिशय मौल्यवान ठरेल.