महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी असा दावा केला की, "ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमधील आमदार देखील सतत संपर्कात आहेत." त्यांच्या या विधानामुळे राज्यात सत्तांतराच्या आणि राजकीय हलचालींच्या चर्चांना जोर चढला आहे.
अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, "ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीतील आमदारही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील." या विधानानंतर विरोधी पक्षातून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गटातही अंतर्गत हालचाल सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत. तर सत्ताधारी शिंदे–फडणवीस–पवार आघाडीच्या गणितातही बदल घडू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
उदय सामंत यांच्या संकेतपूर्ण वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे, कोणत्या आमदारांचा कल बदलू शकतो आणि नेमक्या कोणत्या घडामोडी घडू शकतात, याकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.