मुंबईमधील मिठी नदी प्रकरणासंदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे. 65 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगच्या या घोटाळ्यात आता अभिनेता डिनो मोरिया यांच्यासह आठ जणांना या प्रकरणातील चौकशी संदर्भात ईडीने समन्स बजावला आहे. शुक्रवारी ईडीने मुंबई आणि केरळमधील 15 ते 16 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात आता ईडीने उडी मारल्यामुळे अभिनेता डिनो मोरिया याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध घडामोडींना वेग आला आहे. ईडीने जे छापे घातले, त्यामध्ये रोकड, बँक खाती, डिमॅट अकाऊंट आणि डिजिटल उपकरणे यांची जप्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डिनो मोरिया आणि आरोपी केतन कदम यांच्यात 2019 ते 2022 दरम्यान जे आर्थिक व्यवहार झाले होते, त्याची चौकशी केली जात आहे. अभिनेता डिनो मोरिया याला पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी आता चौकशीचा फास आता आणखी घट्ट झाला आहे. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास आठ तास चौकशी याआधी ही केली होती. मात्र आता ईडीने समन्स बजावल्यामुळे डिनो मोरियासह सहा जणांना ईडीच्या चौकशीला आणि त्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी 'निवडणुकीआधी मोठं काही घडेल', असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ईडीची ही कारवाई आणि राणे यांचे वक्तव्य यामध्ये साम्य असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगामी काळात या चौकशीचे धागेदोरे आणखी कोणाकडे जातात, यातून काय निष्पन्न होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा