नालासोपारातील एका शाळेत मनसेने शाळा प्रशासन दहावीच्या मुलांना लिव्हिंग सर्टीफिकेट, मार्कशिट देत नसल्याचा आरोप करत प्रशासनाला याबाबत जाब विचारला. यावेळी शाळा ट्रस्टच्या अध्यक्षांनी मनसेने शाळेची तोडफोड करून, आपणाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर मनसेने शाळेच्या ट्रस्टीने मनसैनिकांना चप्पल फेकल्याचा आरोप केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील मदर वेलंकनी इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टीफिकेट, मार्कशिट देत नसल्याचा आरोप करत मनसेनं याबाबत आज शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काही पालकांसोबत शाळेत गेले. मात्र तेथे मनसैनिकांनी गोंधळ घातला. शाळेच्या ट्रस्टच्या अध्यक्षा आशा डिसूजा यांनी मनसेला मोबाईल शूट करण्यासाठी रोखल्यावर दोघांमध्ये शाब्दीक तसेच हाणामारीपर्यंत वाद पोहोचला.
पोलिसांनी येवून प्रकरण शांत करतोय तोच पुन्हा मनसे समोरच तक्रार करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आशा डिसूजा यांनी आपल्याकडे खेचल्यावर वाद पुन्हा भडकला. त्यावेळी मनसेने शाळेच्या टेबलची आणि खुर्चीची तोडफोड करत, प्रिन्सिपलच्या केबीन समोरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पालकांनी आणि मनसेने, शाळा दहावीच्या विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देत नसल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या अकरावी-बारावीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा असं करत असल्याचा आरोप केला आहे.
तर शाळेच्या ट्रस्टच्या अध्यक्षा यांनी मनसे आणि पालकांचे आरोप फेटालले आहेत. शाळेनं कुणाही विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशिट थांबवलं नाही, शाळा आता १६ तारखेला सुरु झाली आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशिटबाबत आपण विद्यार्थ्यांना, शाळेला लेखी निवेदन देण्यास सांगत आहोत. शाळेत अकरावी आणि बारावीचे वर्ग असल्याने, येणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण माहिती देत असल्याचं सांगितलं आहे. तुळींज पोलिसांनी हस्तक्षेप घालून प्रकरण शांत केलं आहे. शाळेच्या तक्रारीनंतर तोडफोडप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा