राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेनं बंड पुकारलं असून मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली असून त्यांनी 6 जुलै रोजी त्यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले. मात्र आता मनसेचा मोर्चा 6 ऐवजी 5 जुलै रोजी होणार असल्याची माहिती मनसेनं एक्स पोस्टद्वारे केली आहे. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्या दिवशी मोर्चा न घेता एक दिवस आधी हा मोर्चा घेतला जाणार आहे.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये
सस्नेह जय महाराष्ट्र, आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या 6 जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार 6 जुलैच्या ऐवजी, 5 जुलै शनिवारी सकाळी 10 वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी. आपला नम्र, राज ठाकरे ।
राज्य सरकारच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी हिंदी अनिवार्य नसली तरी, हिंदीऐवजी विद्यार्थ्यांनी इतर कोणतीही भाषा तृतीय म्हणून शिकायची असेल तर त्याला मान्यता दिली जाईल, असं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलं होतं. यावर राज ठाकरेंनी तीव्र नकार दिल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच हिंदीसक्तीला विरोध दर्शावला आहे. यादरम्यान राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेत हिंदीसक्ती विरोधात 6 जुलैला गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या मोर्च्याला सहभागी होण्यासाठी सर्व राजयकीय पक्षांना राज ठाकरेंनी आवाहन केले होते.
हेही वाचा