मराठी भाषेचा अवमान अजिबात खपवून घेणार नाही, अशा पवित्रा घेतलेल्या MNS पक्षाने पुन्हा एकदा परप्रांतियाला आपल्या मनसे स्टाईल चोप दिला आहे. पवईतील L & T च्या सुरक्षा रक्षकाने "मराठी गया तेल लगाने!" म्हणत मराठीचा अवमान केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसैनिकांनी त्याला चोप देत माफी मागायला लावली आहे. दोन दिवसांपूर्वी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी मराठीचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर लगेचच पवईतील सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अवमान केल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईत अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा अवमान करण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी Airtel च्या एका महिला कर्मचाऱ्याने "मराठीत बोलणार नाही, काय करायचंय ते करा", असे म्हणत उद्धटपणे उत्तरे दिल्याचे समोर आले होते. त्यांनाही मनसेसह उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मराठी खाक्या दाखवत त्या महिलेला माफी मागायला लावली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही अनेक घटनांमध्ये हस्तक्षेप करत मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांना खळखट्ट्याक पद्धतीने धडा शिकवला होता.