महाराष्ट्रातील आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राजकीय हालचालींना गती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवतीर्थ येथे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरेंनी पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत नेत्यांना दिशा दिली असून, निवडणुकांची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “मनसेसह शिवसेना (ठाकरे गट), भाजप, शिंदे गट, अजित पवार गट व शरद पवार गट यांना यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित कोणताही राजकीय अर्थ काढणे चुकीचे ठरेल.” त्यांनी स्पष्ट केलं की, ही बैठक फक्त निवडणूक नियमावलीतील त्रुटींवर चर्चा आणि सुधारणा यापुरती मर्यादित आहे. “हे केवळ निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आहे, याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही,” असं देशपांडे यांनी ठामपणे सांगितलं.
यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी काँग्रेससोबतच्या संभाव्य युतीविषयीही स्पष्ट भूमिका मांडली. "आम्ही काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे काँग्रेसने यावर काय बोलावं, याला काही अर्थ नाही. आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरेच ठरवतात आणि ती मांडतात. आम्हीच आमच्या पक्षाच्या भूमिका मांडणार आहोत," असे ते म्हणाले. दरम्यान, छटपूजेवरून सुरू असलेल्या चर्चांवरही मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात आली. “छटपूजेला आमचा विरोध नाही, मात्र जर त्यामागे राजकीय शक्तीप्रदर्शन असेल, तर त्याला विरोध होईल,” असं स्पष्टीकरण देत त्यांनी राजकारण आणि धार्मिक भावना यामधील सीमारेषा अधोरेखित केली.
ठाण्यातील प्रशासनाविरोधात होणाऱ्या मोर्चावरूनही त्यांनी भूमिका मांडली. “जनतेच्या प्रश्नांसाठी जर सगळे पक्ष एकत्र येत असतील, आणि सिस्टम सुधारावी अशी इच्छा असेल, तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे,” असं देशपांडे म्हणाले.
एकूणच, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली स्वतंत्र आणि स्पष्ट भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससोबतची कोणतीही युती नाही, आणि पक्षाचा निर्णय पक्षच घेईल, असा संदेश या बैठकीतून आणि नेतृत्त्वाच्या वक्तव्यांतून स्पष्टपणे दिला गेला आहे.