मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. एमआयजी क्लब येथे झालेल्या या बैठकीला शहराध्यक्ष, सरचिटणीस, विभाग अध्यक्षांसह अनेक नेते उपस्थित होते. राज ठाकरेंनी स्पष्ट केले की मुंबईत तळागाळातील ताकद फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडे आहे. इतर पक्षांची ताकद तुलनेने कमी असल्याने सर्वांनी आता प्रत्यक्ष कामाला लागावे. त्यांनी पदाधिकाऱ्यांना मतदार यादी नीट तपासण्याच्या आणि जबाबदारीने निवडणूक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. 2017 पासून मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा आम्ही मांडत आलो आहोत, हेही त्यांनी आठवण करून दिले.
कबुतरखाना प्रकरणावरही राज ठाकरेंनी ठाम भूमिका मांडली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांना खायला घालणे टाळावे, कारण त्यातून अनेक आजार पसरू शकतात. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. जैन समाजातील आंदोलनकर्त्यांवरही आवश्यक कारवाई व्हायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका केली. लोढा हे कोणत्याही विशिष्ट समाजाचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा, असा सल्ला त्यांनी दिला. कबुतरखान्यासंदर्भात लोढा यांनी महानगरपालिकेला दिलेल्या सूचनांवरही राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आणि अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याचे आवाहन केले.