महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात डान्सबार संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर, अवघ्या काही तासांतच पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी थेट कृती करत डान्सबारवर तोडफोड केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साधारण आठ ते दहा मनसे कार्यकर्ते एका डान्सबारमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करताना दिसून येत आहेत. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो", "राज ठाकरेंचा विजय असो", "हर हर महादेव", "बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असताना या भागात सर्वाधिक डान्सबार कसे काय? असा सवाल सभेत उपस्थित केला होता. त्यानंतर काही तासांतच ही हिंसक घटना घडल्यामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मनसेच्या या कृतीवर विरोधकांकडून काय टीका होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.