नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर तसेच चंदीगड या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणांवर गेल्या चार दिवसांच्या संघर्षादरम्यान सीमेपलीकडून जोरदार हल्ला झाला होता. ऑपरेशन शील्ड अंतर्गत हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. तर, पंजाबमध्ये हा सराव 3 जून रोजी आयोजित केला आहे.
गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले असून लोकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक बनवण्यासाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केली जाईल. हवाई हल्ल्याच्या वेळी लोकांना कसे वाचवायचे, यावर मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यात 2-3 ठिकाणी ही मॉक ड्रिल आयोजित केली जाईल. तसेच, संध्याकाळी ब्लॅकआउट असेल आणि लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मॉक ड्रिलवर भाष्य करताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, "1971 पासून अशा प्रकारचे कवायती झाल्या नाहीत आणि तणावाच्या काळात, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे मॉक ड्रिल सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला."
तर, हरियाणामध्ये आपत्कालीन आणि महत्त्वाच्या सेवा वगळता, महत्वाच्या भागात आणि महत्वाच्या ठिकाणी पूर्णपणे वीजपुरवठा खंडित होईल. रात्री 8 वाजता हा वीजपुरवठा सुरू होईल, तर रात्री 8.15 वाजेपर्यंत चालू राहील. बारमेरच्या जिल्हाधिकारी आयएएस अधिकारी टीना दाबी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार गुरुवार, 29 मे रोजी पाकिस्तानच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जातील.