मुंबईत काही तासांत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होणार आहे. शहरातील विविध मंडळांकडून अंतिम टप्प्यातील तयारी सुरू असून, विशेषतः लालबागचा राजा पाहण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्यामुळे मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे.
लालबागच्या राजाभोवती हजारो पोलीस तैनात करण्यात आले असून, यावर्षी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मंडपाच्या आत-बाहेर २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांमध्ये एआय सर्व्हेलन्स सिस्टम बसवण्यात आली आहे. याच्या मदतीने जर कुणी अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती आढळली, तर तो लगेच ओळखला जाईल. तसेच एखाद्याजवळ बॅग असल्यास, त्यातील वस्तू संशयास्पद आहेत का, याची तपासणीही तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे.
गेल्या वर्षी लालबागच्या राजाभोवती सुरक्षेच्या त्रुटी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर यंदा सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता दाखवली आहे. पोलिसांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही मंडप परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, यंदाच्या लालबागच्या राजाच्या मंडपाला तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा देण्यात आला आहे. प्रवेशद्वार तिरुपती मंदिरासारखे सजवले असून, त्यावर हत्तीची सुंदर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मुकुटाच्या आत लालबागच्या राजाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यातील सजावट सुरू असून, काही तासांतच लालबागचा राजा भाविकांसाठी दर्शनास खुला होणार आहे. चिंचपोकळी, करी रोडसह आसपासच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. एकूणच, यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाभोवती सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वंकष खबरदारी घेतली गेली आहे.