डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील. आणि नितीन पाटील. यांनी दोन पुरुष आणि एका महिला भाजप कार्यकर्त्यांना पकडले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार विशू पेडणेकर. आणि उमेदवार आर्या नाटेकर. यांचे पती सोमनाथ नाटेकर. यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत शिवसेना उमेदवारांनी जाब विचारला. यातूनच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
या हाणामारीत तब्बल चार जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर गुन्हा दाखल केला असून, सोमनाथ नाटेकर. यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील, नितीन पाटील, यांच्यासह पाच जणांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान हाणामारीत जखमी झालेले भाजप उमेदवारांचे पती सोमनाथ नाटेकर. यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील. यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, मात्र शिवसेना उमेदवार नितीन पाटील. यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील. आणि नितीन पाटील. त्यांचा उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून यांना ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी नगरसेवकांनी गर्दी करत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या कारवाईदरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे. यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत आजारी असताना, रक्तदाब वाढलेला असताना अशी कारवाई निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं असून, रुग्णाच्या जीवाला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर या दरम्यान, नितीन पाटील. यांच्या पत्नी आणि त्यांचे नातेवाईक व महिलांनी रुग्णालयाच्या बाहेर संताप व्यक्त करत, कोणतीही माहिती न देता त्यांना रुग्णालयातून हलवण्यात आल्याचा आरोप केला. माझ्या पतीला काही झालं तर प्रशासन जबाबदार असेल. ही दडपशाही नेमकी कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर डोंबिवलीत शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे. एकीकडे प्रभाग 29 मध्ये भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र पैसे वाटप आणि मारहाणीच्या आरोपांनंतर आता दोन्ही पक्ष थेट आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. सध्या डोंबिवलीत तणाव कायम असून, पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.