मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, "आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसे आहेत, लाडक्या बहिणींची मते विकत घेण्यासाठी पैसे आहेत, पण पूल दुरुस्तीसाठी सरकारकडे निधी नाही. ही जनतेशी फसवणूक आहे."
राऊत यांनी एका पत्राची प्रत पत्रकारांना दाखवत सांगितले की, मावळ तालुक्याचे भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी 11 जुलै 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना इंद्रायणी नदीवरील पूल दुरुस्तीबाबत पत्र दिलं होतं. या पुलासाठी 8 कोटी रुपयांची गरज असल्याचं पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं. मात्र मंत्री चव्हाण यांनी केवळ 80 हजार रुपये मंजूर केले. यावर राऊत म्हणाले, "अशी ही निष्काळजीपणाची वागणूक हा जनतेचा अपमान आहे."
राऊतांनी आरोप केला की, "80 हजारांच्या मंजुरीवर मावळचे भाजप आमदार जनतेसमोर खोटं श्रेय घेतात. जनतेवर हे खोटं प्रेम आहे भाजप सरकारचं." त्यांनी अजित पवार यांनाही निशाणा साधताला, "जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी अजूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी तातडीने या दुर्घटनेची पाहणी करून जबाबदारी स्वीकारावी. "तसेच, स्थानीक आमदार सुनील शेळके यांच्यावरही राऊत यांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
हेही वाचा