Raj & Uddhav Thackeray Melava : मराठी अस्मितेचा जयघोष करणाऱ्या 'मराठी विजय दिना'निमित्त आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त कार्यक्रमात ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं. कार्यक्रमाच्या शेवटी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रितपणे मंचावर येऊन फोटो सेशन केलं, ज्याने उपस्थितांचा विशेष लक्ष वेधलं.
विजयी मेळाव्यानंतर अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी एकत्र मंचावर येत उपस्थितांचे स्वागत केलं. यावेळी अमित आणि आदित्य यांनी एकमेकांना गळाभेट देत एकतेचे संकेत दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आदित्य ठाकरेंचा हात धरून त्यांना राज ठाकरेंच्या जवळ नेलं, हे दृश्य ठाकरे बंधूयांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी भावनात्मक होतं.
या सोहळ्याच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयांतून सौहार्दाचा आणि मराठी हितासाठी एकत्र येण्याचा संदेश उमटल्याचं जाणकारांचे मत आहे. राजकीय भूमिकांमध्ये मतभेद असले तरी, सांस्कृतिक आणि अस्मितेच्या प्रश्नांवर ठाकरे कुटुंब एकत्र येऊ शकते, याचे हे ठोस उदाहरण ठरले. कार्यक्रमात मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान यांचा गौरव करण्यात आला आणि 'मराठी माणूस एकवटला तर काहीही अशक्य नाही' हा संदेश या एकत्रतेतून अधोरेखित झाला.